दंडाऐवजी पुष्प देऊन स्वागत : एसडीपीओंची उपस्थितीगडचिरोली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांच्या वतीने ऐरव्ही केली जाते. प्रसंगी वाहनही जप्त करून कारवाई केली जाते. परंतु सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असल्यामुळे गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी बुधवारी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना गांधीगिरीच्या माध्यमातून समज देऊन पुष्पगुच्छ देऊन एसडीपीओंच्या हस्ते स्वागत करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहातील एक भाग म्हणून बुधवारी गडचिरोली येथील मुख्य चौकात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी अडवून त्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते विडंबनात्मक स्वागत करण्यात आले. वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कुठल्याही प्रकारचा दंड न आकारता त्यांचे पुष्प देऊन स्वागत करून त्यांना समज देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी अमृता राजपूत, पोलीस हवालदार भास्कर सेलोटे, वसंत येंदडवार उपस्थित होते. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मंगला आभारे, दयानंद झाडे, नंदना कोडाप, कविता मडावी, रमिजा शेख, गायत्री आसुटकर, जयश्री आव्हाड, तारा आत्राम, शेवंता सुल्वावार यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
वाहतूक सप्ताहात पोलिसांची नियम तोडणाऱ्यांशी ‘गांधीगिरी’
By admin | Updated: January 14, 2016 02:07 IST