दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली भाजपप्रणित राज्य सरकारने महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत यंदा जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक गडचिरोली तालुक्यात ५१ शेतकऱ्यांनी ७६ शेततळ्याचे काम पूर्ण केले असून या शेतकरी लाभार्थ्यांना २५ लाख ६ हजार रूपये अदा करण्यात आले आहे. शेततळे बांधकामात जिल्ह्यात गडचिरोली तालुका अव्वल आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ३४० शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट दिले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाराही तालुक्यातून एकूण ३ हजार ५५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. यातील ३ हजार ४२९ अर्ज पात्र करण्यात आले असून शासन निर्णयातील निकषानुसार जिल्ह्यात ३ हजार ३३८ शेतकऱ्यांना शेततळे बांधकामासाठी पात्र ठरविण्यात आले. विविध त्रुट्यांमुळे जिल्ह्यातील एकूण ८७ शेतकऱ्यांचे शेततळे कामाचे अर्ज रद्द करण्यात आले. शेततळे बांधकामासाठी प्रशासनाच्या वतीने एकूण १ हजार ४१२ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १ हजार ३४० शेततळे बांधकामाचे आदेश संबंधितांना देण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ व्हावी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे या उद्देशाने राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना कृषी विभागामार्फत कार्यान्वित केली. जिल्ह्यात आतापर्यंत १७८ शेततळ्याचे काम पूर्ण झाले असून १९५ शेततळ्याचे काम सुरू आहे. मात्र सदर काम पावसामुळे तुर्तास बंद आहे. पावसाळा संपल्यावर खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आल्यानंतर शेततळ्याच्या कामाला जिल्ह्यात वेग येणार आहे. अग्रीम देण्याची गरज शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांनी आधी शेततळ्याचे काम पूर्ण करावे, त्यानंतर अनुदान देण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सधन शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेततळ्याचे काम पूर्ण केले. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या अनेक पात्र शेतकऱ्यांनी पैशाअभावी शेततळ्याच्या कामाला सुरूवात केली नाही. त्यामुळे शेततळे योजना लोकचळवळ होण्यासाठी शासनाने पात्र शेतकरी लाभार्थ्यांना अग्रीम स्वरूपात रक्कम देण्याची गरज आहे. शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना १० अथवा २० हजार रूपये अग्रीम म्हणून शेततळ्याचे काम सुरू करण्यासाठी द्यावेत, अशी मागणी अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. कोरची, सिरोंचा तालुके माघारले ४धानोरा तालुक्यातील शेततळ्याचे काम पूर्ण केलेल्या सहा शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार, चामोर्शी तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना सात लाख, मुलचेरा तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ५ लाख ५० हजार, देसाईगंज तालुक्यातील चार शेतकऱ्यांना १ लाख ९० हजार, आरमोरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना दीड लाख, कुरखेडा तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना अडीच लाख, अहेरी तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना २ लाख ९० हजार, एटापल्ली तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना तीन लाख व भामरागड तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना ११ लाख रूपये अनुदानाच्या रूपात अदा करण्यात आले आहे. ४मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत कोरची व सिरोंचा या दोन्ही तालुक्यात शेततळ्याचे काम मंजूर करण्यात आले मात्र ३१ जुलै अखेरपर्यंत या तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांनी शेततळ्याचे काम पूर्ण केले नाही. गडचिरोली तालुक्यातील ५१ शेतकऱ्यांनी ७६ शेततळ्याचे काम पूर्ण केले असून या शेतकऱ्यांना २५ लाख ६ हजार रूपये अनुदानाच्या रूपात अदा करण्यात आले आहे.
गडचिरोली तालुका अव्वल
By admin | Updated: August 2, 2016 01:55 IST