वडसा-गडचिरोली, वडसा-रांगी-येरकड-मुरूमगाव-भिलाई, बल्लारशहा-गोंडपिंपरी-आष्टी-आलापल्ली-सुरजागड, मुल-चामोर्शी व गडचिरोली-चामोर्शी-अहेरी-करीमनगर हे रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. यातील केवळ वडसा-गडचिरोली या ५० किमी रेल्वे मार्गाबाबत सध्या प्रस्ताव आहे. उर्वरित मार्ग हे कागदावरच आहेत.गडचिरोली हा पूर्वीचा चंद्रपूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग होता. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यात वडसा (देसाईगंज) हे मोठे गाव होते. देसाईगंज ही व्यावसायिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. इंग्रजांचा या भागात व्यावसायिक दृष्टिकोनातून संपर्क होता. इंग्रजकालीन अधिकारी येथे वास्तव्याला होते. या भागातील माल रेल्वेने वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी रेल्वे मार्गाचे जाळे विकसित केले होते. चांदा फोर्ट ते गोंदिया हा रेल्वे मार्ग इंग्रजांनीच तयार केला. या भागातील माल मध्यप्रदेशात नेता यावा, म्हणून ब्रिटिशांनी वडसा-रांगी-येरकड-मुरूमगाव-भिलाई या रेल्वे मार्गाचेही सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अनेक खुणा धानोरा तालुक्यातील जांगदा गाव परिसरात आहेत, अशी माहिती या भागातील वयोवृद्ध देतात. इंग्रजांनी सर्वेक्षणानंतर या भागात मोठे दगड गाडून त्याच्या सीमारेषा निश्चित केल्या होत्या. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग मार्गी लागू शकला नाही. भिलाई येथे पोलाद प्रकल्प उभा झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर उच्च प्रतिचे लोहखनिज आहे. या खनिजाचा वापर व्हावा, म्हणून जमशेटजी टाटा यांनी येथून चंद्रपुरसाठी रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी दर्शविली होती. १९३१ च्या सुमारास या कामाचे टाटा यांच्यामार्फत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. काही राजकीय घराण्यांनी या कामाला विरोध केला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण होण्यात प्रचंड अडथळे आलेत. इंग्रजी सत्तेनंतरही सरकारने रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात गडचिरोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतही तीन रेल्वे मार्ग जिल्ह्यातच प्रलंबित आहेत. ज्याची ब्रिटीशकाळात नोंद होती.वडसा रेल्वे स्थानकावर हवी तिसरी लाईनवडसा हे चांदाफोर्ट-गोंदिया मार्गावरचे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर तिसरी लाईन टाकणे गरजेचे आहे. तसेच येथे क्रासिंगची व्यवस्थाही निर्माण व्हायला हवी. ज्यामुळे रेल्वेस्थानकावर एकावेळी दोन गाड्या उभ्या ठेवता येवू शकतात. वडसा रेल्वे स्थानकावरील मार्गावर रॅक पार्इंट आहे. येथे नेहमीच मालगाडी उभी असते व या स्थानकावर दोन ट्रॅक उपलब्ध आहेत. गोंदियावर रात्री गाडी वडसाला मुक्कामी असते. मालगाडी उभी असली तर डेमो गाडीला नागभिडला जावे लागते. तसेच वळून परत येण्यासाठी ४० किमीचे अंतर पार करून वडेगाव येथून पलटून यावे लागते, यात डिझेलचाही अपव्यय होतो. तसेच या स्थानकावर ६०० मिटरचा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. मुख्य इमारतीला लागून तो बांधण्यात आला आहे. मात्र सावलीसाठी केवळ १०० फुटाचे शेड आहे. गर्दीच्या वेळी उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागते. प्लॉट फार्म अरुंद आहे. डेमो ट्रेन दुसऱ्या प्लॉट फार्म उभी करावी लागते. चंद्रपूरसाठी जाण्याकरिता वयोवृद्धांना चढताना त्रास होतो. प्लॉटफार्मची उंची वाढविण्यासाठीही निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
गडचिरोलीची रेल्वे कागदावरच
By admin | Updated: January 31, 2015 01:34 IST