गडचिरोली : राज्य शासनाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत राज्य सेवेतील आठ अधिकाऱ्यांच्या विदर्भात बदल्या केल्या असून, तीन अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठविण्यात आले आहे.नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त प्रमोद भुसारी यांना गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. पिंपरी चिचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी यांची गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांना उपजिल्हाधिकारी(रोहयो) या पदावर आणण्यात आले आहे. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी डी.एस.सोनवणे यांची गडचिरोलीचे निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकारी विदर्भात येण्यास अनुत्सूक असतात. त्यामुळे महत्वाच्या पदांचा अनुशेष वाढत जाऊन विकासकामांत अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने बदली व नियुक्तीसंदर्भात एक कायदा केला. त्याअन्वये आता अधिकाऱ्यांना बदली व नियुक्तीच्या स्थळी रुजू होणे अनिवार्य झाले आहे. नव्या कायद्यात पहिली नियुक्ती नागपूर व अमरावती या दोन प्रशासकीय विभागात करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने शासनाने आठ अधिकाऱ्यांच्या विदर्भात बदल्या केल्या असून, त्यात पाच जण नवीन आहेत.पुण्याच्या यशदा संस्थेतील सहायक प्राध्यापक अर्जुन चिखले यांची चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अनिल पवार यांची चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी(रोहयो)म्हणून नियुक्ती झाली आहे. चिमूरच्या उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांची गोंडपिपरीला बदली करण्यात आली आहे.गडचिरोलीत गेल्या चार महिन्यात दोन निवासी उपजिल्हाधिकारी बदलले आहेत. राम जोशी यांची आठ महिन्यांतच बदली झाली. त्यानंतर आलेले सुनील गाढे यांचेही अल्पावधीत स्थानांतरण करण्यात आले. त्यामुळे नवे अधिकारी किती काळ राहतील, हा प्रश्न जिल्हावासीयांपुढे निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गडचिरोलीला मिळाले तीन नवे उपजिल्हाधिकारी
By admin | Updated: November 23, 2015 01:15 IST