गडचिरोली : तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता. मात्र गडचिरोली जिल्हा निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पुढाकार घेऊन १९८१ मध्ये चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. त्यामुळेच बॅ. ए. आर. अंतुले हे खरे गडचिरोली जिल्हा निर्मितीचे उद्गाता होते. आज मंगळवारी बॅ. अंतुले यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाला निरोप दिला. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर बॅ. ए. आर. अंतुले आले असता, त्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीची घोषणा केली. या जिल्ह्याच्या विकासाचा अॅक्शनप्लॅनही त्यांनी तयार केला. दुर्गम भागातील विकास साधण्यासाठी रस्ते इतर सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला. मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात करण्यात आली. बॅ. ए. आर. अंतुले हे उत्तम प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळातच जिथे पंचायत समिती तिथे तालुका ही संकल्पना पूर्णत्वास आणली होती. त्यामुळेच सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत झाली. लोकाभिमूख निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा होता. अल्पसंख्यांक समाजाचे ते मोठे नेते होते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिलेले मारोतराव कोवासे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य रविंद्र दरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्हा निर्मितीचा उद्गाता हरपला
By admin | Updated: December 2, 2014 23:05 IST