खासदारांचे आश्वासन : आढावा बैठकीत पाणीटंचाई, स्वच्छता व इतर विषयांवर चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यात खालावत असल्याने शहराच्या बहुतांश वॉर्डात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी हनुमान वॉर्ड व विसापूर वॉर्डात पाणी टाकी मंजूर करण्यात आली आहे. सदर पाणीटाकी बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने कामात अडचण आहे. आपण शासनाकडे पाठपुरावा करून या दोन्ही स्वतंत्र पाणीटाकीच्या बांधकामासाठी निधी मिळवून देणार, असे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले. खा. अशोक नेते यांनी सोमवारी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या दालनात नगर परिषदेची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदू काबरा, भाजपच्या पदाधिकारी रेखा डोळस आदी उपस्थित होते. सदर बैठकीला नगर पालिकेचे बरेच विभाग प्रमुख अनुपस्थित होते. याबद्दल खा. अशोक नेते यांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित विभाग प्रमुखांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात यावा, असे निर्देश खा. नेते यांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांना दिले. अनुपस्थित विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या खुलासा पत्रात समाधानकारक उत्तर न आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, असे निर्देश खा. नेते यांनी दिले. शहराच्या सुरक्षेसाठी नगर पालिकेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. गडचिरोली शहरात एकच अग्निशमन दल असून जिल्ह्यात अग्निशमन सेवा अपुरी आहे. त्यामुळे आणखी एका अग्निशमन वाहनाची गरज आहे. ते मंजूर करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी यांनी खा. नेते यांच्याकडे केली.
पाणी टाकीसाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 01:51 IST