फौजदारी गुन्हा दाखल करा : धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोपसिरोंचा : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी शासनाकडे परत गेला. परिणामी आदिवासी नागरिक विकासापासून वंचित राहिले. सुरजागड लोहप्रकल्प व मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी जनतेची प्रचंड दिशाभूल केली, असा आरोप राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा येथे विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. पोचमपल्ली येथे जाऊन मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करताना या प्रकल्पाच्या विरोधात लवकरच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे धर्मरावबाबांनी सांगितले. या मोर्चासाठी राकाँचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सुरजागड लोहपहाडी परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निकष डावलून तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करून येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी वनकायदा पायदळी तुडवून रस्ता तयार करण्यात आला आहे. सुरजागड लोह प्रकल्पाच्या मुद्यावर पालकमंत्री जनतेचे हित लक्षात न घेता कंपनीच्या समर्थनार्थ बोलत आहेत, असा आरोपही माजी राज्यमंत्री आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा विकासाचा निधी परत गेल्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार आहोत, असेही धर्मरावबाबांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष आकुला मल्लिकार्जुन, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सतीश भोगे, अॅड. फिरोज खान, रूद्रशेट्टी कोंडय्या, रवी रालबंडीवार, सुरेंद्र अलोणे, रमजान खान, चिनन्ना दुर्गम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:13 IST