देसाईगंज : स्थानिक दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण व विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाने ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार क्रिष्णा गजबे यांनी लोकमतला दिली. त्यामुळे आता देसाईगंजच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील दीक्षाभूमीवर २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विराट सभेला संबोधीत केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासीक स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, तसेच येथील दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यीकरणाचे काम करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न शासनाकडे सातत्याने लावून धरला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे आता सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी देसाईगंजच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्याच टप्प्यात सदर ५० लाखांचा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार क्रिष्णा गजबे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देसाईगंजच्या दीक्षाभूमीचा विकास होण्याचे स्वप्न आपण ‘याची देही, याची डोळा’ बघणार असल्याची प्रतिक्रिया आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पंढरी गजभिये यांनी व्यक्त केली आहे.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 01:34 IST