सर्वेक्षणाचे काम पूर्ण : मुंबईच्या अधिकाऱ्यांची चमू पोहोचली लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या पुलाजवळ आंतरराज्यीय सीमा तपासणी नाका बनविण्यात येणार आहे. येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, राजस्व, अबकारी, सेलटॅक्स, वन विभागासह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तैैनात राहणार आहेत. आंतरराज्यीय तपासणी नाका उभारण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाकरिता मुंबईच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सिरोंचा गाठले. दिवसभरात त्यांनी येथे सर्वेक्षणाचे काम त्यांनी पूर्ण केले. गोदावरी नदीच्या पुलावरून तेलंगणा व छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस.आर. नायक यांनी सिरोंचा येथे आंतरराज्यीय सीमा तपासणी नाका बनविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी मुंबई येथून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चमू सिरोंचात दाखल झाली. या अधिकाऱ्यांसोबत सोबत सद्भावना कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. सर्वेक्षणादरम्यान एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता दिलीप साळुंखे, कार्यकारी अभियंता मुक्तेश वाडकर, सद्भावना कंपनीचे प्रतिनिधी कपिल, विकास उनियाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे, विलास अहेर, कार्यकारी अभियंता मेश्राम, शाखा अभियंता सय्यद, सिरोंचा तहसीलदार अतुल चोरमोरे, मंडळ अधिकारी आर. आर. मंडावार, जी. सी. गागापूरपू, तलाठी गजभिये, वालिवकर, गोरेवार, गारले आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्याचे कामही सद्भावना कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. त्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून संगणकीय पद्धतीने वाहनांची तपासणी केली जाते.
सिरोंचात होणार सीमा तपासणी नाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:29 IST