गडचिरोली : पोटेगाव पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी राजोली-पोटेगाव मार्गावर सापळा रचून वाहनातून सुमारे ४ लाखाचा सुगंधीत तंबाखू जप्त केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. माकंर्डी गोसावी भुरसे (४७), भजन सुधाकर मेश्राम (२१) व परशुराम दुधिराम बघेल (३०) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. छत्तीसगढ राज्यातून एम.एच.३३/जी/१२८९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने गडचिरोली जिल्ह्यात तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोटेगाव पोलिसांनी राजोली मार्गावर सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता १९ पेट्या सुगंधीत तंबाखू आढळून आला. या तंबाखूची किंमत ३ लाख ८० हजार रुपये व जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ५ लाख, असा एकूण ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आठडाभरापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ राहूल खाडे यांच्या पथकाने गडचिरोली शहरातून १५ लाखाचा सुगंधीत तंबाखू जप्त केला होता, हे विशेष़.राज्यात सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असताना जिल्ह्यात अवैधरित्या सुगंधीत तंबाखूची विक्री करण्यात येत आहे. या कारवाईमुळे तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
चार लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By admin | Updated: November 29, 2014 23:21 IST