अहेरी : नजीकच्या महागाव येथील प्राणहिता नदीघाटावर सापळा रचून आलापल्ली वन विभागाच्या फिरत्या पथकाने शनिवारी ०.४८८ घनमीटरचे १९ हजार ७५३ रूपये किंमतीच्या सागवान पाट्या जप्त करून दोन वनतस्करांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी महागाव येथील नामदेव अलोणे यांच्या फर्निचर मार्ट दुकानात धाड टाकून तेथील दोन कारागिरांना अटक केली. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सीताराम मडावी, दुर्गा मडावी, फर्निचर दुकानातील कारागीर महेश राजेश जग्गम व मोतीराम मल्लेरा गोंगले आदींचा समावेश आहे. फर्निचर मार्टचे मालक नामदेव अलोणे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो फरार आहे. शनिवारी सागवान पाट्यासह दोन वनतस्करांना अटक करण्यात आली. या आरोपींची चौकशी केली असता, सदर सागवान माल मोहगाव येथील नामदेव अलोणे यांच्या फर्निचर दुकानात फर्निचर बनविण्यासाठी नेण्यात येत होते, अशी माहिती दिली. यावरून फिरत्या पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजता फर्निचर दुकानात धाड टाकून तेथील दोन कारागिरांना वनकायद्यान्वये अटक केली.सागवान तस्कर प्रकरणातील मुख्य आरोपी फर्निचर दुकान मालक नामदेव अलोणे यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. फर्निचर दुकानात धाड पडणार असल्याची माहिती अलोणे यांना आधिच मिळाली असावी, त्यामुळेच फर्निचर मालक अलोणे हे फरार झाले. यात वनाधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास फिरत्या पथकाच्या वनाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
चार आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: June 3, 2015 01:57 IST