शिरपूर येथे सभा : पाच गावातील नागरिकांचा एकमताने निर्णय; एफडीसीएमला विरोध कायमचवैरागड : कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३० व ३२ मधील १० हेक्टर वनक्षेत्रातील घनदाट जंगलात वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोड केली. या वृक्षतोडीला वन परिक्षेत्राच्या हद्दीतील पाच गावातील नागरिकांनी विरोध केला असून यापुढे एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना जंगलतोड करू देणार नाही, असा एकमताने निर्णय नागरिकांनी शनिवारी बोलाविलेल्या सभेत घेतला.शिरपूर येथे सावलखेडा वन परिक्षेत्रातील विहिरगाव, चिखलीरिठ, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा या पाच गावातील नागरिकांची संयुक्त बैठक शनिवारी घेण्यात आली. या सभेला आमदार क्रिष्णा गजबे उपस्थित होते. पाच गावातील नागरिकांनी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना जंगलतोड करण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर एफडीसीएमचे ब्रह्मपुरी क्षेत्राचे अधिकारी व्ही. आय. कोरे यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिले. ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या मार्फत लोकांना समजवून वृक्षतोड करू देण्याची विनंती केली. मात्र सावलखेडाच्या नागरिकांनी पोलिसांनाही न जुमानता एफडीसीएमच्या अवैध वृक्षतोडीला विरोध दर्शविला. या संबंधी नागरिकांनी जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा विरोध केला. सावलखेडाच्या सभेला शिरपूर, सावलखेडा, विहिरगाव, चिखली, भगवानपूर, वाढोणा आदी गावातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
वन विकास महामंडळाला जंगल तोडू देणार नाही
By admin | Updated: February 22, 2016 01:37 IST