आलदंडी नदीतून वाहतूक : लिलाव न झालेल्या नदीपात्रातून रेतीची उचलएटापल्ली : आलदंडी नदीच्या पात्रातून रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. या ट्रॅक्टर मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्या सोडण्यात आल्या आहेत. आलदंडी नदी घाटाचा लिलाव महसूल विभागाने केला आहे. मात्र ट्रॅक्टर चालकांनी महसूल विभागाची सीमा ओलांडून वन विभागाच्या सीमेतील पात्रात रेती उपसण्यास सुरूवात केली होती. ही बाब वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहित होताच त्यांनी बुधवारी सायंकाळी आलदंडी नदीवर जाऊन रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रालीसह ताब्यात घेतले. त्यांच्यावर १९२७ च्या वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर ट्रॅक्टरचे चालक रावजी नरोटे, शिवा गुडरू, गणेश गावढे, बंडू तलांडे यांच्यावर सुध्दा गुन्हा नोंद केला. त्यानंतर चारही ट्रॅक्टर मालकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई वनरक्षक अशोक राम पऱ्हाड यांनी केली. याबाबत ट्रॅक्टरमालकांना विचारणा केली असता, आपल्याकडे परमीट असतानाही वन विभागाने ट्रॅक्टर पकडून गुन्हा नोंद केला. हा आपल्यावर झालेला अन्याय असल्याचे म्हटले आहे. तर वन विभागाने आलदंडी नदीचा लिलाव जरी झाला असला तरी सदर लिलाव नदीच्या पात्राच्या डाव्या बाजुचा झाला आहे. भामरागड तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या उजव्या बाजुचा लिलाव झाला नाही. मात्र या ठिकाणी रेतीचे उत्खनन केले जात होते. त्यामुळे या ट्रॅक्टर कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर त्या सोडण्यात आल्या असल्याची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)
चार ट्रॅक्टरवर वन विभागाची कारवाई
By admin | Updated: June 24, 2016 01:58 IST