गणेशोत्सवावर बैठक : सागर कवडे यांचे आवाहनगडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी सहायक धर्मदाय आयुक्त यांच्याकडून आपल्या मंडळाची नोंदणी करून घ्यावी, तसेच कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी येथील पटेल मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, पाटील, सहायक धर्मदाय आयुक्त पेटकर, नायब तहसीलदार लोणारे, महावितरणचे अभियंता जोशी, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक आदी उपस्थित होते. यावेळी गणेशमूर्ती स्थापनेचे मंच मजबूत व सुरक्षित असावेत, मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी २४ तास मंडळाचे स्वयंसेवक नेमावे, महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मंडपाला आग लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी, मंडळांनी वादग्रस्त देखावे, झांकी तयार करू नये, मंडपामध्ये जुगारसारखे कृत्य करू नये, आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
उत्सवात नियमांचे पालन करा
By admin | Updated: August 24, 2016 02:17 IST