गडचिरोली : गडचिरोली या दारूबंदी जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारूविक्री संदर्भात धाडसत्र बंद झाले आहे. त्यातच पोलीस विभागावर कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच नक्षल कारवायांना नियंत्रणात ठेवण्याचे काम असल्याने अवैध दारू विक्री रोखण्यात पोलीस यंत्रणेला बराच मोठा ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांसह मोठ्या गावांमध्ये अवैध दारू विक्रीला उधान आले आहे. तेलंगणा व विशेषत: छत्तीसगड राज्यातील बनावट दारू मोठ्या प्रमाणावर गडचिरोली जिल्ह्यात पाठविली जात आहे. या अवैध दारूच्या सेवनात तरूण मुले व नागरिक गुरफटलेले आहेत. या जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा, छत्तीसगड राज्याला लागून आहे. तर काही सीमा या गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांना लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री वाढत चालली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर छत्तीसगडच्या हद्दीत अनेक परवानाप्राप्त दारू दुकाने उघडण्यात आली असून तेथील दारू राजरोसपणे गडचिरोली जिल्ह्यात पाठविली जात आहे. बराचसा भाग हा नक्षलग्रस्त असल्याने या भागात रात्रीची गस्त पोलिसांना घालण्यात अडचण आहे. त्यामुळे पहाटे २ ते ५ या वेळात अवैध दारू विक्रीची वाहतूक तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून केली जात आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पूल झाल्यामुळे अनेक नागरिक कन्नेपल्ली, कालेश्वर येथील परवानाप्राप्त दारू दुकानातून दारू पिऊन व सोबत घेऊन येऊ शकतात. या भागात कोणतीही चौकशी वाहनांची व येणाऱ्या नागरिकांची केली जात नाही. पाखांजूर-पेंढरी मार्गेही गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातून दारूची वाहतूक केली जाते. महिन्या-दोन महिन्यांत एखाद्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करतात. बाकी दिवस मात्र दारूच्या वाहतुकीसाठी संपूर्ण भाग मोकळाच आहे. गडचिरोली जिल्ह्यात १० हजारावर अधिक महिला व नागरिक या अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या आहेत. आता मात्र काही ठराविक पोलीस ठाण्यातच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून एकही कारवाई दीड ते दोन वर्षात झालेली नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्याचा ते फायदा घेत आहेत. चामोर्शीच्या दारू विक्रेत्यांना तडीपार करा ४चामोर्शी येथील काही राजकीय प्रतिष्ठा लाभलेले लोक या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उतरलेले आहे. भामरागडपर्यंत त्यांच्या माध्यमातून दारूचा पुरवठा केला जात आहे. चामोर्शीच्या पुढचा संपूर्ण भाग या एकट्याच पुरवठादाराने व्यापून टाकला असून या दारू विक्रेत्यांवर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात पाच पेक्षा अधिक केसेस दाखल आहेत. चामोर्शी तालुक्यातील सहा दारूविक्रेत्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी महिला संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दारूबंदीच्या जिल्ह्यात परप्रांतीय दारूचा महापूर
By admin | Updated: August 23, 2016 01:24 IST