शिवसेनेचा वीज अभियंत्यांना घेराव : वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून विजेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता बोबडे व शाखा अभियंता हुकरे यांना शुक्रवारी घेराव घालून निवेदन सादर केले. वीज वितरण कंपनीच्या मार्फत वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल पाठविले जात आहेत. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज बिल कमी करण्यात यावे, या बरोबरच बिघडलेले मीटर बदलवून द्यावे, वीज बिलामध्ये असलेला स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार आदी शुल्कांच्या माध्यमातून आगाऊचे बिल पाठविले जात आहे. हे आकार कमी करण्यात यावे. मागील चार महिन्यांपासून घरगुती मीटरची मागणी करणाऱ्यांना अजूनपर्यंत मीटर देण्यात आले नाही. एलईडी बल्ब बदलवून देण्याची सुविधा देसाईगंज येथेच करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यात आला. त्यांच्यासोबत वीज समस्यांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, माजी तालुका प्रमुख विठ्ठल ढोरे, विजय सहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम, दिनेश मोहुर्ले, डॉ. विरेन मंडल, गायकवाड, पंकज पाटील, बलराम कुळमेथे, महेश तलमले, विक्रांत बगमारे, झरकर, प्रमोद मेश्राम, विकास प्रधान, एच. के. दोनाडकर, डॉ. अनिल उईके, रमेश उके, जयपाल चावला, दिनेश गाभाडे, भूषण राठी, गोटू जोशी, रवी बेहरे, डिंपल चावके, अण्णा फटींग, अलिभाई शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
देसाईगंजातील वीज समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:45 IST