८६ हजार नागरिकांची तपासणी : १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान करण्यात आले सर्वेक्षणगडचिरोली : केंद्र शासनाच्या निर्देशानंतर जिल्हा आरोग्य विभागाने १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान कुष्ठरोग शोध पथकांनी २ लाख ७ हजार २७० कुटुंबांना भेटी देऊन ८ लाख ६० हजार ७२२ नागरिकांची तपासणी केली असता, ५ हजार ४९८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. कुष्ठरोगाबाबत भारतीय समाजात चुकीच्या समजुती असल्याने कुष्ठरोग रुग्णाला समाजाकडून अत्यंत हिनतेची वागणूक दिली जाते. वेळीच उपचार झाल्यास सदर आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना या आजाराबाबत फारशी जागृती नाही. त्यामुळे सदर आजार होऊन विकृती येण्याचे प्रमाण आढळून येते. देशभरात कुष्ठरोग शोध मोहीम राबवून कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेला केले होते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर दरम्यान शोध मोहीम राबविली होती. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ हजार ६९ शोध पथके निर्माण करण्यात आली होती. या शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कुष्ठरोग रुग्ण कसा ओळखावा, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील सुमारे २० लाख ७ हजार २७० कुटुंबांना भेट दिली आहे. भेटीदरम्यान कुटुंबातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. ४ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार ७२२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान ५ हजार ४९८ नागरिकांना कुष्ठरोगाची लागण झाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व नागरिकांचे रक्तनमूने घेऊन ते प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी पाठविले जाणार आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये ज्या नागरिकांना कुष्ठरोग झाला असल्याचे आढळून येणार आहे, त्यांना कुष्ठरोग रुग्ण समजले जाऊन त्यांच्यावर आरोग्य विभाग उपचार करणार आहे. (नगर प्रतिनिधी)कुष्ठरोगाचे जुने ५०० रूग्णराज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे आढळून येते. रुग्णांचा शोध घेण्यासाठी यापूर्वी शासनाने तालुकास्तरावर कर्मचारी नेमले होते. हे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन कुष्ठरोगाचे रुग्ण शोधत होते. या कर्मचाऱ्यांनी ५०० रूग्ण शोधले होते. मात्र एप्रिल २०१६ मध्ये त्यांची सेवा खंडित करण्यात आली. तेव्हापासून कुष्ठरोग शोध मोहीम थांबली होती. या मोहिमेमुळे आणखी शोध मोहिमेला गती मिळाली आहे. ५ हजार ४९८ संशयीत रुग्णांपैकी किमान ५०० कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या मोहिमेचा वेळोवेळी आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संपूर्ण कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. देसाईगंज व गडचिरोली ही दोन शहरे शिल्लक आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. - डॉ. अमित साळवे, वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, कुष्ठरोग विभाग
कुष्ठरोगाचे पाच हजार संशयित
By admin | Updated: October 14, 2016 01:44 IST