पत्रकार परिषद : नाना पटोले यांची मागणीगडचिरोली : सुरजागड लोहप्रकल्प पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या हद्दीमध्ये येते. या क्षेत्रातील लोहखनिजाचे उत्खनन करून कंपनीने पेसा कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर हजारो झाडे तोडून वनसंवर्धन कायद्याचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भडांरा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनी केली आहे. लोहखनिज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच व्हावा यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका ठेवून आहेत. सुरजागड येथील पहाडीवर ६० टक्केपेक्षा अधिक लोहमिश्रीत दगड आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोखंड असलेला आशियातील एकमेव पहाड आहे. छत्तीसगड राज्यातील भिलाईपेक्षाही मोठा प्रकल्प या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी लोहप्रकल्प झाल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. यामुळे येथील मानव विकास निर्देशांक वाढेल. विरोधकांनी प्रकल्पाच्या बाबतीत राजकारण न करता हा प्रकल्प जिल्ह्यातच झाला पाहिजे, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. शेवटी जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न आहे. सुरजागड लोहप्रकल्पाबाबत संसदेतही आवाज उठविला जाईल, लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान खासदार नाना पटोले यांनी दिली. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी आदी उपस्थित होते.
लॉयड मेटल कंपनीवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:16 IST