वैरागडात अवैध उत्खनन : तहसीलदारांनी निरीक्षक व तलाठ्यांना सुनावले खडेबोलवैरागड : येथील काहार मोहल्ला वडेगाव-मेंढा गावाकडे जाणाऱ्या लांजेवार बोडीपर्यंतच्या रस्ता दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. परंतु या ठिकाणी टाकण्यात आलेले १५ ट्रॅक्टर ट्रॉली मुरूम कोणताही महसूल न भरता अवैधरित्या उत्खननाचे आहे. या प्रकरणाची तहसीलदार मनोहर वलथरे यांनी स्वत: मोका चौकशी केली. त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी बैठकीत महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांना उत्तर मागितले परंतु त्यांच्याजवळ उत्तर नसल्याने चांगलेच खडेबोल सुनावले. ग्राम पंचायत अंतर्गत या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या १५ लाख रूपये निधीतून सुरू आहे. मात्र याकरिता लागणारे मुरूम कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न काढता अवैधरित्या उत्खनन करून टाकण्यात आले. विशेष म्हणजे या रस्त्यावर टाकलेला मुरूम मागील वर्षी एका शेतकऱ्याच्या शेतात खोदण्यात आलेल्या शेत तलावाचे आहे. सदर काम कृषी विभागाच्या मार्फतीने करण्यात आले होते. परंतु रस्त्याच्या कामाकरिता लागणारे मुरूम तलावाच्या बनलेल्या पाळीतून खोदून रस्त्यावर टाकण्यात आले. शेताला सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेततळ्यांची निर्मिती केली जाते. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी बनलेल्या शेततळ्याच्या पाळीचे मुरूम टाकणे कितपत योग्य आहे, असा सवाल वैरागड येथील शेतकरी करीत आहेत. तहसीलदार मनोहर वलथरे यांनी या संदर्भात मोका चौकशी करून महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांना ‘तुमच्या भागात होणारे अवैध उत्खनन माहीत होत नसेल तर राजीनामा देऊन नोकरी सोडा’, असे खडेबोल सुनावले. (वार्ताहर)
शेततळ्याचे मुरूम रस्त्यावर टाकले
By admin | Updated: November 3, 2015 00:47 IST