८ डिसेंबर रोजी : विजय वडेट्टीवार यांचे शेतकऱ्यांना आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत येथे केले राज्यात यावर्षी अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. परिणामी कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये व बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदतीचे पॅकेज शासनाने जाहीर करावे, शासनाने तांदळाची निर्यात बंद केली असल्याने धानाचा भाव मागील वर्षीच्या तुलनेत ४०० ते ५०० रूपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. कापसालासुध्दा अत्यंत कमी भाव दिला जात आहे. केंद्र शासनाने धान व कापूस यांच्या हमी भावात यावर्षी केवळ ५० रूपयांनी वाढ केली तर सोयाबीनच्या भावात एकही रूपया वाढ केली नाही. त्यामुळे ही कापूस, सोयाबीन व धानाच्या किमती कमी झाल्या आहेत. या सर्व बाबींसाठी केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यात दुष्काळ घोषीत करण्याबरोबरच पीक कर्ज पूर्णपणे माफ करावे व शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथील घटनेला दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपवावा, अशीही मागणी आ. वडेट्टीवार यांनी केली. भाजप सरकारने निवडणूक काळात दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. राम मेश्राम उपस्थित होते.
विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा
By admin | Updated: December 4, 2014 23:08 IST