कुरखेडा : जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कुरखेडा येथील राजीव भवनात शनिवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते करण्यात आले. तर मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून चांगदेव फाये , भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एस. बी. ब्राह्मणकर, पी. एस. नेहरकर, डॉ. एस. एल. बोरकर, प्रा. वाय. के. सानप, प्रा. एस. एस. कऱ्हाळे, प्रा. व्ही. पी. सातार उपस्थित होते.शाश्वत शेतीबरोबरच शेतमालाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने मृदा तपासणी करून स्वत:च्या जमिनीचे आरोग्य जाणून घेतले पाहिजे. असे झाल्यास कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. राजेंद्र इंगळे, महेंद्र बिसेन, मेश्राम सिध्देश्वर बेले, विस्तार अधिकारी फाये यांनी महिला व बचत गटांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना जीवन नाट यांनी स्वत:च्या आरोग्याप्रमाणेच शेतातील मातीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तपासणी अहवालानुसार धान पिकाकरिता खत मात्रेचे नियोजन करावे, त्यामुळे अनावश्यक खतांचा वापर टाळून जमिनीचे आरोग्य टिकविता येईल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रा. दीपक अनोकार, धोंडगे, गणवीर, खुडे, बापूजी भोयर, कमल भांडेकर, टेकाडे, सुभाष ठाकरे, जितेंद्र कस्तुरे यांनी सहकार्य केले. शेतकरी मेळाव्याला कुरखेडा परिसरातील ३०० शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मृद तपासणीबाबत शेतकरी मेळावा
By admin | Updated: December 7, 2015 05:42 IST