विसोरा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने निरोप घेतला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सध्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानपिकाला शेवटचे पाणी देऊन वाचविण्यासाठी धडपड करतांना दिसून येत आहेत.अपेक्षेबाहेर झालेल्या पावसाच्या उशिरा आगमनाने धानपिकाची पेरणी व रोवणीलाही उशीर झाला मात्र हलक्या प्रतीच्या धानपिकांना हवे तेवढे अनुकूल वातावरण लाभले. परंतु आजघडीला धान पिक अगदी अंतिम टप्प्यात असतांना बळीराजा पाणी देण्यासाठी तुडुंब भरलेल्या तलाव, बोड्या तसेच रस्त्यालगतचे खड्डे यातील पाणीसाठ्यावर मोटर पंप लावायला घाई करीत असल्याचे दृष्टीस पडत आहे. विशेष म्हणजे येत्या १५-२० दिवसात १०१० सारखे हलके धान बीज कापण्यायोग्य होतील, असा शेतकरी बांधवांचा अंदाज आहे. त्यामुळे गावागावातील शेतकरी मिळेल ते साहित्य वापरून कोणत्याही परिस्थितीत आपले धान पिक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आहे. पाणीसाठे असलेल्या ठिकाणी शेतकरी मोटारपंप लावून आपल्या धानपीकांना पाणी देत आहे. (वार्ताहर)
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By admin | Updated: September 29, 2014 23:04 IST