तळोधी : तळोधी येथील शेतकऱ्याच्या दोन म्हशी विज तारेचा करंट लावून मारल्यावर त्यांना शेतातच गाडणाऱ्या गणपती सातपुते या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आदर्श पुरस्कार प्राप्त गणपती सातपुते या शेतकऱ्याने या पूर्वीही आपल्या शेतात विजेचा करंट लावून अनेक वन्य जीवांचा बळी घेतला व त्यांना शेतातच गाडले, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान ८ एप्रिल रोजी कुनघाडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोक्का पंचनामा करून शेतातील एका खड्यातून बलाढ्य रानटी डुकराचा मृतदेह जप्त केला. तसेच गुरूवारी वन विभागाने पुन्हा एका खड्ड्यातून दुसऱ्या एका डुकराचे अवशेष मिळविले. त्यावर पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व पुन्हा हे मृत जनावर दफन करण्यात आले. यावेळी चामोर्शीचे पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ डॉ. उसेंडी यांनी शवविच्छेदन केले. वन विभागाच्या वतीने सहायक वनरक्षक मोहन नाईकवाडी, वन परिक्षेत्राधिकारी चांगले, फिरते पथक कर्मचारी, क्षेत्र सहायक सोनवणे, वनरक्षक सोनटक्के, चांदेकर, गोडसेलवार, कोरेत व पंच उपस्थित होते. चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना सांगितले.
शेतकरी सातपुतेला पोलीस कोठडी
By admin | Updated: April 10, 2015 01:08 IST