भामरागड : जिल्ह्यात आकस्मिक आरोग्य सेवेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रूग्णालयाच्या ठिकाणी एक रूग्णवाहीका, दोन वाहनचालक व दोन डॉक्टर देण्यात आले आहेत. सदर आकस्किम आरोग्य सेवा २४ तासाकरीता आहे. या योजनेंतर्गत रूग्णांना गरजेच्यावेळी १०८ या टोल फ्री नंबरवर कॉल करून वाहन व डॉक्टर रूग्णांच्या गावी तत्काळ बोलाविण्यात येते. मात्र भामरागड तालुक्यात या सेवेअंतर्गत डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने या सेवेचा पुर्णत: बट्याबोळ झाला आहे. भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात आकस्मिक आरोग्य सेवेअंतर्गत दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन वाहनचालक नियुक्त करण्यात आले असून रूग्णवाहीकाही देण्यात आली आहे. मात्र डॉ. राकेश हिरेखन व डॉ. अर्चना हिरेखन आदी दोनही डॉक्टर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत भामरागडच्या ग्रामीण रूग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार एक व्यक्ती दोन ठिकाणी सेवा देऊन शासनाचे मानधन मिळवू शकत नाही. सदर प्रकार लक्षात आल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबतची माहिती कळविण्यासाठी भामरागड ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. यासंदर्भात भामरागडच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे विचारणा केली असता, गेल्या १ तारखेला डॉ. राकेश हिरेखन व डॉ. अर्चना हिरेखन यांनी आकस्किम आरोग्य सेवेचा राजीनामा दिला आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे आकस्मिक आरोग्य सेवेकरीता डॉक्टरच उपलब्ध नसल्याने पुरविण्यात आलेली रूग्णवाहीका निरूपयोगी ठरली आहे. डॉक्टरांशिवाय वाहनचालक या सेवेचा कॉल स्वीकारू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
आकस्मिक आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ
By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST