आरमोरी : येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना आवश्यक असणाऱ्या अनेक सोयी- सुविधांचा अभाव आहे. येथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नाहीत. परिणामी आरोग्य सेवा प्रभावीत झाली आहे. दूरवरून रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रूग्णांना येथे सोयी- सुविधा मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयातील विविध समस्या मार्गी लावून आवश्यक सोयी- सुविधा द्याव्या, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांच्या मार्फतीने आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गरीब रूग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय देसाईगंज, कुरखेडा, कोरची, ब्रम्हपूरी, नागभिड तालुक्यातीलही अनेक रूग्ण येथे उपचारासाठी येतात. रूग्णालयात रूग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र अनेक आजारांच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रूग्णालयात कमतरता असल्याने तसेच अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेचा भार मोजक्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे. वैद्यकीय अधीक्षकांनाही वॉर्ड सांभाळावे लागत आहे. रूग्णांना सोयी- सुविधा मिळत नसल्याने त्यांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे. उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या अनेक समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. हंसराज बडोले, तालुकाध्यक्ष भीमराव ढवळे, धर्मा बांबोळे, बी. यू. रामटेके, के. डी. बांबोळे, सुरेश चौधरी, धम्मानंद मेश्राम, विनोद शेंडे, मनोज धात्रक, आनंद उके, अमेश सोनकुसरे उपस्थित होते.
आरमोरी रूग्णालयात सुविधा द्या
By admin | Updated: September 3, 2015 01:11 IST