गडचिरोली : भाजपप्रणीत मोदी सरकारने एक वर्षात अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.मंगळवारी येथील केमिस्ट भवनात भाजपा शहर व तालुका शाखेच्या वतीने वर्षपूर्ती व महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, अनिल पोहणकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, अविनाश महाजन, पं. स. सदस्य डॉ. प्रमोद धारणे, डी. के. मेश्राम, अनिल कुनघाडकर, श्रीकृष्ण कावनपुरे, प्रतिभा चौधरी, लक्ष्मी कलंत्री, रूमन ठाकरे, सुधाकर नायक, नंदकिशोर काबरा, प्रशांत भृगुवार, जनार्धन साखरे, रेखा शेडमाके, पुष्पा शेडमाके, सावित्री गेडाम आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सूत्र हाती घेतल्यापासून देशाच्या विकासाचा दर वाढला आहे. तत्कालीन राज्य व केंद्र सरकारच्या काळात ५० टक्के शेतपिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळत होती. त्यामुळे ५० टक्क्याच्या आत नुकसान झालेले अनेक शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहत होते. मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपप्रणीत केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलून ५० टक्क्याच्या आत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गासाठी शासनाकडून निधी मिळाला असल्याने या मार्गाचे काम मार्गी लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असे अभिवचनही खा. नेते यांनी यावेळी दिले.याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांनी भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच लोककल्याणाच्या निर्णयामुळे जनतेला न्याय मिळत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भृगुवार, संचालन श्रीकृष्ण कावनपुरे यांनी केले तर आभार भाजपाचे गडचिरोली शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपा, भाजयुमो तसेच भाजपाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या कामाची माहिती पुस्तिका वितरित करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
योजना जनतेपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: June 3, 2015 01:56 IST