कुरखेडात व्याख्यान : विजय जावंधिया यांचे प्रतिपादन कुरखेडा : अर्थ व्यवस्थेतील मोठा निधी शहर विकासासाठी खर्च केला जातो. यामुळे गावांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी गाव व शहर यांच्यातील आर्थिक अंतर वाढत चालले असून भविष्यातील ही धोक्याची नांदी असल्याचा इशारा महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते व विचारवंत विजय जावंधिया यांनी दिला. येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयातील भाऊराव कढव स्मृती सभागृहात समाज विज्ञान अभ्यास मंडळाद्वारे मंगळवारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या या विषयावर विजय जावंधीया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, डॉ. दशरथ आदे, डॉ. रवींद्र विखार, प्रा. संजय महाजन, डॉ. ते. ना. बुध्दे शेतकरी नेते राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू खुणे, पंढरी नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय जावंधिया म्हणाले, काल मार्क्सने सांगितले होते की, भांडवलदार श्रमाच्या मुठीतून भांडवल तयार करतात. मात्र वर्तमान स्थितीत भारतात संघटीत भांडवलदार व संघटीतश्रम हे हातात हात घालून असंघटीत भांडवलदार, शेती, असंघटीत शेतमजूर यांचे शोषण करीत आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक, सामाजिक समानता असलेला समाज निर्माण करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न शेतीचा वाटा सुमारे ४८ टक्के होता. तो आता १२ ते १४ टक्क्यांवर आला आहे. सेवा क्षेत्राचा वाटा सुमारे ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई वाढली की, सेवादारांना वेतनवाढ मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला त्या प्रमाणात भाव मिळत नाही. या तफावतीमुळे उत्पादनात वाढ होऊनही शेती तोट्यात आहे. तोट्याच्या शेती व्यवसायामुळे गावात दारिद्र्य आहे. मात्र गरीबीमागचे खरे कारण गावात नसून असंतुलीत अर्थव्यवस्थेत आहे, असे जावंधिया म्हणाले. डॉ. गोगुलवार यांनी मार्गदर्शन करताना मूठभर लोकांकडे जगातील अर्धे अधिक संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. आर्थिक विषमता दूर होऊन संपत्तीचे विकेंद्रीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार प्रा. खोपे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
देशातील मोठ्या शहरांच्या विकासासाठी गावांचे शोषण
By admin | Updated: January 18, 2017 01:39 IST