दीपक आत्राम यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडीवर उत्खननाचे काम खासगी कंपन्यांकडून सुरू करण्यात आले आहे. शासनाने व कंपनीने हा लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात कुठे टाकला जाणार आहे, यात किती लोकांना रोजगार दिला जाणार आहे, हे स्पष्ट करावे, त्यानंतरच उत्खनन करून लोहखनिजाची वाहतूक करावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. या मागणीसंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तत्पूर्वी बुधवारी माजी आमदार दीपक आत्राम यांनी सूरजागड परिसराला भेट देऊन येथील उत्खनन कामाची पाहणी केली व जनसुनावणी झाल्याशिवाय मालाची वाहतूक करू नये, असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले, अशी माहिती आत्राम यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी याबाबत जनसुनावणी तत्काळ घ्यावी, हेडरी ते बांडे लोहखनिज उत्खननासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद करावे असे म्हटले आहे. या प्रकल्पासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही दीपक आत्राम व आदिवासी विद्यार्थी संघ एटापल्ली शाखेने केली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. सदस्य कारू रापंजी, मंगेश हलामी, रवी खोब्रागडे, रमेश वैरागडे, अनिल करमरकर, श्रीकांत चिप्पावार, प्रज्वल नागुलवार, बानय्या जनगम, अजय आत्राम, तिरूपती चिट्टयाला, विजय कुसनाके उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
लोह प्रकल्प कुठे होणार हे स्पष्ट करा!
By admin | Updated: April 8, 2016 01:09 IST