गडचिरोली : अप्पर आयुक्त कार्यालयाने नागपूर येथील इंग्रजी माध्यमांची दुसरी शाळा सुचविल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळेतील प्रवेशाचा गुंता तब्बल चार महिन्यानंतर सुटला आहे. ५० विद्यार्थ्यांचे प्रवेशही झाले असून ७ आॅक्टोबरला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीने दिल्या आहेत. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना राहणे, भोजन, निवास व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. मात्र या शाळांचा दर्जा सुमार झाला आहे. त्यामुळे काही निवडक विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभाग शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेऊन देतो. याचा सर्व खर्च आदिवासी विकास विभाग उचलते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी १०८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १०३ अर्ज मंजूर करण्यात आले. या विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील एका शाळेची निवड करण्यात आली होती. मात्र सदर शाळेने अवाढव्य शुल्क मागितल्याने सदर शाळा रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून ही प्रक्रिया रखडली होती. दुसरी शाळा कधी देणार व आपले प्रवेश कधी होणार यासाठी आदिवासी विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर नागपूर येथील अखीलेश कॉन्व्हेंटची निवड करण्यात आली व त्या ठिकाणी ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरित ५३ विद्यार्थी अजुनही वेटींगवरच आहेत. या ५३ विद्यार्थ्यांना कधी प्रवेश मिळेल हे अजुनपर्यंत निश्चित झालेले नाही. आदिवासी विकास विभागाच्या या लेटलतीफ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. (नगर प्रतिनिधी)
अखेर नामांकित शाळेतील प्रवेशाचा गुंता सुटला
By admin | Updated: October 6, 2014 23:12 IST