नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाई एकावरही नाहीगडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मनाई आदेश असतानाही नगर पालिका क्षेत्रात शहरात उघड्यावर कचरा जाळला जात आहे. नगर पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यासह अन्य सह अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे अत्यंत निष्काळजीपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.उघड्यावर कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण व आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता, न्यायालयाने यासंदर्भात स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उघड्यावर कचरा जाळणे थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, पालिका प्रशासनाने रोज सकाळी शहरात फिरण्यास सांगावे, कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि यासंदर्भात टीव्ही, रेडिओ व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करावी, असे आदेश न्यायालयाने मनपासह नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात सर्वांनाच अपयश आले आहे. नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी रोज सकाळी रस्त्यांवरील कचरा गोळा करतात. हा कचरा एकतर गडरलाईनमध्ये टाकला जातो किंवा जाळला जातो. अनेक नागरिक आपल्या घरातील कचरा घराबाहेर जाळतात. हा प्रकार गडचिरोलीसह देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातही दिसून येतो. शासकीय कार्यालय परिसरातदेखील कचरा जाळला जातो. मोकळ्या जागेवर कचरा जाळणाऱ्यांना ५00 ते १000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा नियम आहे. परंतु ही कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात विदभार्तील सर्व महानगरपालिका व नगर परिषदांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्वांना नोटीस बजावली आहे. याचिकेवर १७ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हायकोर्टाच्या मनाईनंतरही उघड्यावर कचरा जाळणे सुरूच
By admin | Updated: June 3, 2015 01:53 IST