एटापल्ली : राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिसांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी एटापल्ली पंचायत समिती कार्यालयासमोर आटकशी संलग्न असलेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात सोमवारी निदर्शने केली. इंधन बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी, जिल्ह्यातील विद्यार्थी पटसंख्येनुसार मानधन द्यावे, शाळेमध्ये अतिरिक्त कर्मचारी निवडण्याच्या प्रकारावर पायबंद घालावे, जिल्हा परिषद शाळा रेंगाटोला येथील स्वयंपाकी पियुश मोहन बकला याला पूर्ववत कामावर घ्यावे, २०११ पासूनचे थकीत मानधन न देणाऱ्या शिक्षकावर कारवाई करावी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान सात हजार रूपये वेतन लागू करावे, त्यांची शिपाईकम कुक पदावर नेमणूक करावी आदी मागण्यांसर्भात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन या मागण्यांसंदर्भात सुमारे एक तास चर्चा केली. आंदोलनात शेकडो कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनापूर्वी एटापल्ली येथील गोटूलच्या सभागृहात जुबेदा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यालाही एटापल्ली तालुक्यातील शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिला.
एटापल्लीत आयटकची निदर्शने
By admin | Updated: March 18, 2015 01:38 IST