रस्ता केला मोकळा : तळोधी (मो.) ग्रा. पं. चा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क तळोधी (मो.) : तळोधी (मो.) ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या रामपुरी टोली परिसरातील रस्त्यावर एका खासगी व्यक्तीने तब्बल एक एकर जागेमध्ये अतिक्रमण केले होते. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन आवागमनास अडथळा निर्माण होत होता. अखेर तळोधी (मो.) ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या पुढाकाराने २७ व २८ जून रोजी दोन दिवसात या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला. संबंधित ठिकाणी मोकळी जागा असून वास्तव्य असलेल्या कुटुंबाने प्रमाणापेक्षा जास्त जागा अडवून अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण येत्या काही दिवसात काढण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकाने स्वत:हून आपले अतिक्रमण काढावे व ग्राम पंचायतीच्या मालकीची जागा मोकळी करून ग्राम पंचायतीला सहकार्य करावे, अन्यथा सदर अतिक्रमणधारकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून कारवाई करण्यात येईल, असे ग्राम पंचायत प्रशासनाने म्हटले आहे. रामपुरी टोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढताना सरपंच माधुरी सुरजागडे, पोलीस पाटील अनिल कोठारे, ग्रा. पं. सदस्य सत्यफुला कर्णासे, तंमुसचे पदाधिकारी शेख अहमद शेख, ग्रामविकास अधिकारी देवानंद फुलझेले, रामपुरी येथील सुनील भोयर, प्रदीप किरमे, सुरेश फापणवाडे, जीवन गेडाम, मारोती गुरनुले, संदीप गेडाम आदी उपस्थित होते. अतिक्रमण हटविण्यात आलेली मोकळी जागा यापुढे गरजू व्यक्तींना उपलब्ध करून देणे सोयीचे होईल, असे ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले यांनी सांगितले.
रामपुरी टोलीवरील अतिक्रमण काढले
By admin | Updated: June 29, 2017 02:11 IST