गडचिरोली : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे गडचिरोली शहरात १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालय निर्मितीसह अनेक कार्यालयीन विकास कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी आघाडी राज्य शासनाकडून खेचून आणला. त्यामुळे गडचिरोलीच्या स्वतंत्र महिला रुग्णालयास स्व. आर. आर. पाटील (आबा) यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही भूमिका घेऊन आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० जून रोजी निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यापासून जिल्हा विकासाला गती मिळाली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या अर्थसंकल्पात आर. आर. पाटील यांनी भरीव वाढ केली. त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली येथे कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय, वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय, मंडळ कार्यालय उभारणीचे काम पूर्णत्वास आले. निवेदन देताना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ. हेमंत अप्पलवार, जि. प. चे माजी अध्यक्ष हर्षलता येलमुले, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष खुशाल वाघरे, प्रा. ऋषीकांत पापडकर, नंदलाल लाडे, लीलाधर भरडकर, दिलीप धात्रक, डॉ. देवीदास मडावी, रामचंद्र वाढई, अविनाश श्रीरामवार, चंद्रकांत चन्नावार, अविनाश वरगंटीवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पुलाचे काम प्रगतिपथावर४पालकमंत्री असताना आर. आर. पाटील यांनी सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पुलाचे काम मंजूर केले. आता सदर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून महामार्ग व इतर विकासात्मक कामे त्यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात आर. आर. पाटील यांचे भरीव योगदान असल्याने त्यांचे नाव महिला रुग्णालयाला द्यावे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महिला रुग्णालयास आबांचे नाव देण्यासाठी राकाँ आग्रही
By admin | Updated: June 21, 2016 01:11 IST