गडचिरोली : नव्या सहकार कायद्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह मुदत भरलेल्या सेवा सहकारी संस्था यांच्या निवडणूका पुढील काळात होऊ घातल्या आहे. या निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्या सहकार कायद्यामुळे सदस्य संख्येवरही मर्यादा आलेली आहे. आता सहकारी संस्थांमध्ये २१ च्या वर संचालक संख्या ठेवता येणार नाही. त्यामुळे अनेक मतदार संघही रद्द होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२७ सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असल्याची माहिती जिल्हा सहनिबंधक जयेश अहेर यांनी लोकमतशी बोलताना दिली. यामध्ये सेवा सहकारी संस्थांसह अन्य सहकारी संस्थांचाही समावेश राहणार आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी कोरची तालुक्याचा स्वतंत्र मतदार संघ रद्द करून कोरची-कुरखेडा असा दोन तालुक्याचा मिळून एक मतदार संघ निर्माण करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सत्तारूढ भाजप, सेना आघाडीचे नेतेही पॅनल उतरविण्यासाठी मोर्चेबांधणीला लागलेले आहेत. (शहर प्रतिनिधी)
सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले
By admin | Updated: February 5, 2015 23:09 IST