जिल्हा रूग्णालयातील स्थिती : अनेकवेळा रक्ताचा तुटवडा गडचिरोली : वाढते अपघात व कुपोषणामुळे गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रक्ताची अधिक गरज भासते. वर्षभरात जवळपास सुमारे आठ हजार बॅग रक्ताची आवश्यकता निर्माण होते. मागणीच्या तुलनेत रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याने बऱ्याचवेळा दुसऱ्या जिल्ह्यातूनही रक्त आणावे लागते. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे ब्लड बँक आहेत. तर कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा या रूग्णालयांमध्ये रक्तसाठा केंद्र उपलब्ध आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेती व शेतीवर आधारीत उद्योग करतात. या सर्वच नागरिकांना दिवसभर कष्टाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांना शहरी नागरिक व बैठेकाम करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत जास्त कॅलरीजची गरज भासते. मात्र गरीबीमुळे सदर नागरिक शरीराला आवश्यक तेवढ्या कॅलरीज मिळतील या दर्जाचा पोषक आहार घेऊ शकत नाही. परिणामी त्याचे शरीर अशक्त होते. थोडाफार आजार जरी झाला तरी तो अशक्त पडून त्याला रक्ताची गरज भासते. २०१४-१५ या वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ७ हजार ४११ बॅग रक्ताची मागणी निर्माण झाली. मात्र पुरवठा ७ हजार ८ बॅग एवढा आहे. मागणीच्या तुलनेत रक्त कमी उपलब्ध होत असल्याने रक्तपेढी प्रशासनाला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. सामाजिक संस्था व नागरिकांना आवाहन करून रक्त शिबिरांचे आयोजन करावे लागते. प्रगत जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सर्वाधिक रक्ताची गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. २०१६ वर्षातील जानेवारी महिन्यात ५४७, फेब्रुवारी महिन्यात ४७५, मार्च महिन्यात ५१०, एप्रिल महिन्यात ५०१ व मे महिन्यात ६४५ असे एकूण २ हजार ६७८ बॅगचा वापर झाला आहे. (नगर प्रतिनिधी) गरोदर महिलांसाठी सर्वाधिक वापर उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयातून प्रसुतीच्या गुंतागुंतीच्या केसेस जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविल्या जातात. यापैकी बहुतांश गरोदर मातांना अशक्तपणा निर्माण झाला राहत असल्याने व त्यांच्यामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी राहत असल्याने त्यांना रक्ताची गरज हमखास भासते. प्रसुतीचा काळ अत्यंत जोखीमेचा राहत असल्याने सदर महिलेला जिल्हा सामान्य रूग्णालय सुध्दा प्राधान्याने रक्त उपलब्ध करून देते. जवळपास ३० टक्के रक्त गरोदर मातांसाठी वापरले जाते.
वर्षाला आठ हजार बॅग रक्ताची गरज
By admin | Updated: July 25, 2016 01:38 IST