‘इन्स्पायर अवार्ड’ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोपगडचिरोली: भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली तर्फे इन्स्पायर अवार्डंतर्गत गडचिरोली जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येथील कारमेल हायस्कूलमध्ये ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. यात राज्यस्तरासाठी आठ प्रतिकृतीची निवड करण्यात आली.समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून कारमेल हायस्कूलचे प्राचार्य जॉय, पं.स.चे गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे, मुख्याध्यापक मनोज कवठे उपस्थित होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १०५ प्रतिकृती सादर करण्यात आल्या. या सहभागी प्रतिकृतीत एटापल्ली या दुर्गम तालुक्यातील राजमाता राजकुमारी विद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती कोटा आत्राम हिने ‘सोलरबंब’ यावर प्रतिकृती सादर करीत पहिल्या आठ क्रमांकात स्थान पटकाविले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम म्हणाले, जिल्हा अतिदुर्गम असला तरी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी इन्स्पायर अवार्ड योजनेतंर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाला साद घालत आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देत संशोधनवृत्तीला चालना दिली. प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा आधार असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. संचालन प्रा. मनोज हुलके तर आभार जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)निवड झालेल्या आठ उत्कृष्ट प्रतिकृतीउत्कृष्ट प्रतिकृतींमध्ये प्रीती कोटा आत्राम ‘सोलरबंब’ राजमाता राजकुमारी विद्यालय एटापल्ली, कपील बिश्वास ‘उर्जा बचतीचे प्रभावी उपाय’ महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव, ईशा बावणे ‘गाईच्या शेणापासून विद्युत निर्मिती’ साईनाथ विद्यालय येवली, प्रभात सरकार ‘हॉयड्रालिक जेसीबी’ देशबंधू चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल येनापूर, साक्षी गिरडकर ‘विजेची बचत व यांत्रिकी बलापासून वीज निर्मिती’ रामनगर प्रायमरी हायस्कूल गडचिरोली, वैभव खोब्रागडे ‘व्हाईट कोल निकेल’ गोविंदराव हायस्कूल खरपुंडी, अविनाश दर्रो ‘आधुनिक शेतीसाठी अत्याधुनिक यंत्र’ मोहिनी हायस्कूल खेडेगाव, आणि गणेश कडते ‘विद्युत रहित स्प्रेपंप’ भंगवंतराव आश्रमशाळा लगाम (मूलचेरा) यांचा समावेश आहे.
आठ प्रतिकृती राज्यस्तरावर
By admin | Updated: November 14, 2016 01:58 IST