पाच गंभीर : आलदंडी पोलीस मदत केंद्रातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : अचानक आलेल्या वादळाने लगतचे झाड तंबूवर कोसळल्याने आलदंडी पोलीस मदत केंद्राचे आठ कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी ३.३० वाजताच्या सुमारास आलदंडी पोलीस मदत केंद्राच्या परिसरात घडली. जखमी आठ पैकी पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. गंभीर जखमींमध्ये संग्राम अशोक भोसले (२८), नेहल शेख (२६), मयूर गणेश मोरे (२६), उमेश विष्णू दुलाल (३०) व सतप्पा कांबळे (२४) या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर घटनेत आनंद शिवाजी साठवे (२६), साईनाथ दिनकर जाधव (२६) व पांडुरंग महादेव पाटील (२८) हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. १५ दिवसांपूर्वी एटापल्ली तालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे पोलीस विभागातर्फे नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या परिसरात इमारतीचे काम सुरू आहे. मात्र सध्या तंबू ठोकून पोलीस मदत केंद्राचा कारभार येथील कर्मचारी सांभाळत आहेत. दुपारी व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात कुठेना कुठे वादळी पाऊस होत आहे. गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आलदंडी परिसरात वादळ आले. पोलीस मदत केंद्रातील तंबूलगत असलेले मोठे झाड वादळामुळे तंबूवर कोसळले. यात पोलीस मदत केंद्रातील आठ कर्मचारी जखमी झाले. या सर्वांना एटापल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पाच जणांना अहेरीला हलविले आहे.
तंबूवर झाड कोसळून आठ पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:28 IST