नीलगाय शिकार प्रकरण : विद्युत प्रवाह लावून केली शिकारगडचिरोली : ६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अड्याळ जंगल परिसरात विद्युत प्रवाहाने निलगायीची शिकार करून आरोपींनी मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान चामोर्शीच्या वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तपासचक्र फिरवून आठ आरोपींना अटक केली. न्यायालयाने या सर्व आरोपींना गुरूवारपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.वनकोठडी सुनावलेल्या आरोपींमध्ये कान्हू पत्रु गोहणे (४०) रा. चांदेश्वर, बंडू रामा घोडाम (४०) रा. रेश्मीपूर, रघुनाथ विठ्ठल कुळमेथे (५०) रा. विष्णूपूर, चरणदास गणपत मडावी (४०) रेश्मीपूर, सुनिल भाऊजी तोडसाम (३५) रेश्मीपूर, विनायक सिताराम घोगरे (५०) रा. चांदेश्वर, येमाजी मारोती रोहणकर (३३) रा. चांदेश्वर, गुणाजी उमाजी रोहणकर (४५) रा. चांदेश्वर यांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार आरोपी पत्रू गोहणे यांनी अड्याळ बिटामध्ये विद्युत प्रवाह लावून ६ जुलैच्या रात्री निलगायीची शिकार केली. ७ जुलै रोजी सकाळी सापडलेले ४ आरोपी हे निलगायीचा मांस खाण्याचा प्रयत्न करीत होते. या आरोपींकडे चौकशी केली असता, यांनी या प्रकरणात आणखी तीन आरोपी असल्याची माहिती दिली. वनपरिक्षेत्राधिकारी गाजलवार यांनी चौकशी करून ७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तीन आरोपींना ताब्यात घेतले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनाधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी तपास केला असता, खंड क्रमांक ३५७ मध्ये रक्ताचे डाग आढळून आले. या रक्ताच्या डागावरून चांदेश्वर गावात जाऊन चौकशी केली असता, कान्हू पत्रू गोहणे यांच्या घरी निलगायीचा शिजलेला मांस मिळाला. जीवंत विद्युत वाहनीला तार जोडून निलगायीची शिकार केल्याची कबुली कान्हू गोहणे यांनी वनाधिकाऱ्यांसमोर दिली. अंदाजे १०० किलो वजनाची गर्भवती असलेल्या निलगायीची शिकार झाल्याचे चौकशी आढळून आले. यावरून आरोपींविरूद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६, वन्यजीव अधिनियम १९२७ चे कलम ९, ३९, ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्र सहाय्यक संजय पेंपकवार, राजेश पाचभाई, आर. के. जल्लेवार, वनरक्षक व्ही. ए. जुमनाके, विनोद गोलीवार, विजय मुत्तेमवार, रविंद्र जुवारे, धनंजय कुंभरे, जे. टी. निमसरकार, एम. एस. साखरे, आर. टी. समर्थ, सचिन जांभुळे आदींनी केली. (शहर प्रतिनिधी)
आठ आरोपींना वनकोठडी
By admin | Updated: July 9, 2014 23:25 IST