गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठामध्ये अनेक अडचणी असतानाही आपल्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी विकासाचा तसेच प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार १३ आॅक्टोबर २०१४ रोजी घेतला. नवीन विद्यापीठ असल्याने निधीसह अनेक अडचणी समोर आल्या. मात्र या अडचणींवर मात करीत विद्यापीठाच्या विकासाचे अनेक चांगले उपक्रम सुरू केले. या उपक्रमांना विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सहकार्य लाभले.विद्यापीठाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या एसटीआरसी प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या कारकिर्दीत झाले. सामान्य फंडातून इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. निकाल उशीरा लागत असल्याने याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. हे लक्षात घेऊन परीक्षा प्रणालीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सुरू झाले. परीक्षांचे निकाल कमी कालावधीत लागलीत यासाठी परीक्षा विभाग गतिमान केला. यावर्षी ३० जूनपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्याचा आपला मानस होता. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांची लेट फी मधून मुक्तता करण्यात आली आहे. नागपूर बोर्डाप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही ग्रेस मार्क देण्याचा निर्णय विद्यापीठाने २३ मार्च रोजी घेतला आहे. जैन संघटनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींना आत्मसंरक्षण व सक्षमीकरणाचे धडे देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे तंबाखूमुक्तीकरण करण्यासाठी सर्च व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आॅनलाईन पध्दतीने उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन गोंडवाना विद्यापीठात सुरू झाले आहे. आॅनलाईन पध्दतीने मुल्यांकन करणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील मुंबईनंतर दुसरे विद्यापीठ आहे. यावर्षी नवीन महाविद्यालयांचे दोन व नवीन तुकड्यांचे चार प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)
विद्यापीठ विकासासाठी प्रयत्न केले
By admin | Updated: April 23, 2015 23:59 IST