४२ वा वर्धापन दिन उत्साहात : शेकडो मान्यवरांची उपस्थितीभामरागड : कर्मयोगी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने साकार झालेले तसेच पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक परिश्रमाने अविरत सुरू असलेल्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाचा ४२ वा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी शैक्षणिक गंमत जत्रेचे आयोजन करण्यात आले. या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात कर्मयोगी स्व. बाबा आमटे व स्व. साधना आमटे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्या प्रमुख मंजिरी परांजपे, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, जगन मचकले, डॉ. विलास तळवेकर, रेणुका मनोहर, शरीफ शेख यांच्यासह पुणे, मुंबईवरून आलेले शेकडो मान्यवर उपस्थित होते. लोकबिरादरी प्रकल्पाच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्या प्रमुख मंजिरी परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. २५ डिसेंबरला डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या जन्मदिवसानिमित्त विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम व २६ डिसेंबरला डॉ. प्रकाश आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
लोकबिरादरी प्रकल्पात शैक्षणिक गंमत जत्रा
By admin | Updated: December 24, 2015 02:04 IST