लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना तपासण्या करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारीपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काेराेना तपासणीचे काम ठप्प पडले आहे. रुग्णांची ओळख न झाल्याने रुग्णांचा एकाच वेळी भडका उडण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेना आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी अँटिजन व आरटी पीसीआर या चाचण्या केल्या जातात. आरटी पीसीआरची स्वतंत्र लॅबसुद्धा जिल्हा रुग्णालयात आहे. काेराेना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून मानधनच मिळाले नाही. मानधन देण्यात यावे, यासाठी वेळाेवेळी पाठपुरावा करूनही शासनाने जिल्हा परिषदेला त्यांच्या मानधनाचे अनुदान उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. परिणामी, काेराेना तपासण्या करण्याचे काम ठप्प पडले असल्याचे दिसून येत आहे.
काेराेना रुग्णांचा उडणार भडका
काेराेनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. ७ जानेवारी राेजी आवश्यक तेवढ्या चाचण्या झाल्या असत्या तर हा आकडा पुन्हा वाढला असता. मात्र, पाहिजे तेवढ्या चाचण्या झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांची ओळख हाेऊ शकली नाही. हे रुग्ण इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन काेराेनाचा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तातडीने ताेडगा काढण्याची गरज आहे.
शुक्रवारी केवळ ७६ चाचण्या ६ जानेवारीपर्यंत दरदिवशी ५०० ते १५०० चाचण्या केल्या जात हाेत्या. मात्र, आंदाेलन सुरू हाेता हे काम जवळपास ठप्प पडले आहे. ८ जानेवारी राेजी केवळ ७६ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अँटिजेनवर सुरू आहे चालढकलआरटी पीसीआर चाचण्या करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांशिवाय दुसरा काेणताच कर्मचारी ही चाचणी करू शकत नाही. काेराेना विषाणूची खरी ओळख याच चाचणीमुळे हाेते.