म्युकरमायकोसिस या आजाराला काळी बुरशी असेही म्हटले जाते. हा बुरशीजन्य आजार असून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हा आजार होतो. नुकतेच शासनाकडून या आजाराला साथरोग आजार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य विभाग प्रशासन या रोगाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली असल्याने म्युकरमायकोसिस या आजाराचा साथरोग आजारामध्ये समावेश केलेला असल्यामुळे त्याचे नियमित सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. या माध्यमातून रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणता येईल व रुग्णांमधील गंभीर आजार व मृत्यू टाळता येथील.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय आहे
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून ही बुरशी माती, वनस्पती, हवा, खराब झालेली फळे व भाजीपाला, शेण इत्यादी ठिकाणी आढळते. तसेच ही बुरशी निरोगी माणसाच्या नाकामध्येही आढळून येऊ शकते. या आजारामध्ये प्रामुख्याने सायनसमध्ये बाधा होते. तेथून डोळे, मेंदू, जबडा तसेच फुप्फुसापर्यंत पसरु शकतो. मधुमेह असलेले रुग्ण, तसेच रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, कॅन्सर बाधित रुग्ण, एचआयव्ही-एड्स बाधित रुग्ण व सद्य स्थितीत कोविड करीता स्टेरॉईडचे उपचार घेणारे रुग्ण आदींमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्यास गंभीर स्वरुपाचा आजार उद्भवू शकतो. या आजारामध्ये मृत्यूदर ५० टक्केच्या आसपास असून स्टेरॉईडचा वापर या आजाराची लागण होण्यातील एक प्रमुख घटक आहे. मधुमेह असलेल्या व नसलेल्या दोन्ही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे म्युकरमायकोसिस होण्यास कारणीभूत ठरते. साधारणपणे कोविडमधून उपचारानंतर बरे झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते.
आजारासाठी कारणीभूत होणारे घटक
अनियंत्रित मधुमेह औषधांचा उपचारात वापर, स्टेरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्युनोमॉडूलेटर औषधाचा उपचारात वापर, दीर्घकाळ आयसीयुमध्ये उपचार, दीर्घकाळ ऑक्सिजनवरील उपचार (नसल प्राँगचा वापर करुन ), सहव्याधी (अवयव बदली किंवा कॅन्सर), होरीकॉमेझोल उपचार, दीर्घकाळासाठी ट्यूबमधून अन्न देणे, हुमीडीफायर बॉटलचे कंटामिनेशन, उच्च प्रतिजैविकाचा दीर्घकाळासाठी वापर, किडनी व लिव्हरचे जुने आजार आदींमुळे हा आजार हाेण्याची शक्यता राहते.
ही आहेत प्रारंभीची लक्षणे
साधारणपणे म्युकरमायकोसिस संशयित रुग्ण पुढील लक्षणांवरुन ओळखता येईल. यात डोळे दुखणे, नाक बंद होणे, चेहऱ्यावर बधिरता येणे, दिसायला कमी किंवा दोन प्रतिमा दिसणे, डोळ्याला सूज येणे, डोळा लाल होणे, डोळे दुखून उलटी होणे, वागण्यामध्ये बदल (नातेवाईकांना विचारणे), नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे आदी लक्षणे दिसून येतात.