जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी : स्वत:ची काळजी घ्या, आरोग्य प्रशासनाची सूचनागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४६ अंशाच्या आसपास गेलेले आहे. चालू महिन्यात उष्माघातामुळे जिल्ह्यात कुरखेडा व वाकडी येथे दोन इसमाचा मृत्यू झाला. वाढत्या उष्णतामानामुळे रस्ते दुपारी १२ वाजतानंतर सुनसान होऊन जातात. वाढत्या उष्णतामानापासून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य प्रशासनाने केल्या आहे. यावर्षी उन्हाळा अतिशय तीव्र स्वरूपाचा राहणार असल्याचे हवामान खाते व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाने ४४ अंशाच्या वर पारा गाठला असून या उष्णतामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुलरही काम करीत नसल्याचे अनेकजण सांगतात. जिल्ह्यात याच महिन्यात उष्माघाताने दोन जणांचा जीवही गमावला गेला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतामानात नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असे प्रशासनाने सूचविले आहे. यामध्ये आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असते, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात, घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखत, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आणि अत्यावश्यक आहे. तसेच पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते तेव्हा शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशाच्या पुढे जाऊ लागते. शरीराचं तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटिन अक्षरश: शिजू लागते. स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. रक्तातले पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होते, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वाढत्या उष्णतामानामुळे रस्तेही झाले सुनसान
By admin | Updated: April 24, 2016 01:26 IST