शेतकरी चिंताग्रस्त : शेत जमिनी कोरड्या लोकमत न्यूज नेटवर्क विसोरा : जूनचा शेवट होत असूनही पाऊस गायब झाल्याने विसोराच्या दोन ते तीन किमी परिघातील शेकडो हेक्टर शेतजमीन पेरणीवीना अजूनही पडीक आहे. आभाळात ढगांची तोबा गर्दी दाटून येते खरी परंतु त्यातून पावसाच्या सरी मात्र बरसत नसल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. असेच चित्र देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात दिसून येत आहे. देसाईगंज हा धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी जूनच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस पडतो. यावर्षी मात्र ही परंपरा मोडीत निघाल्याने विसोरा-शंकरपुर दरम्यानच्या तसेच दोन-तीन किमी सभोवतालच्या हजारो एकरवरील भातपीक लागवडीची जमीन पडिक आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील जमीन नांगरणी योग्य सुध्दा झाली नाही. विसोरा, शंकरपूर दरम्यान पावसाच्या एक-दोन सरी आल्या तरी शेतजमीन नांगरणी करण्याइतपत ओली न झाल्यामुळे बहुतांश बळीराजांनी शेताकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. शेतातल्या मातीत ओलसरपणाच नसल्याने बांध्यांच्या धुऱ्यांवरील तूर आंतरपीकासाठीची माती टाकण्याचे काम खोळंबले आहे. हा परिसर संपूर्णत: शेतीवर अवलंबून असून पाऊस असा दूर दूरवर गेल्यास येथील नागरिकांचे आर्थिक वेळापत्रक कोलमडेल व शेतकरी हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी लागणारी बियाणे घेतली. ज्या शेताला पाण्याची मोटारपंप, विहीर अशा सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी मृग नक्षत्राच्या आधीच मशागतीची कामे आटोपून जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पेरणी आटोपल्या. मात्र आता शेतकऱ्यांनी पेरणीचे काम थांबविले आहे.
पावसाची दांडी, धान पेरणीला विलंब
By admin | Updated: June 29, 2017 02:05 IST