गडचिरोली : मोकाट जनावरे गाव शिवारातील शेतीमधील पिकांची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हानी सहन करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी पूर्वी गावागावांत ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाड्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आता गावागावातील पशुधन कमी होत असल्याने गावात उभारण्यात आलेल्या कोंडवाड्याच्या इमारती आता ओस पडल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागात शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय केला जात होता. शेतीतीतच चाऱ्याची निर्मिती होत असल्याने पशुपालनालाही भरभराटीचे दिवस होते. गावातच खंडीने जनावरे राहत होते. गाव गोहण (गावातील सर्व जनावरे एकत्र करून ते चरण्यासाठी जंगलात नेणे) राहत होते. अनेकदा ही जनावरे पिकांचे नुकसान करीत त्यामुळे अशा जनावरांना कोंडण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कोंडवाडे उभारण्यात आले आहे. याच्या प्रशस्त इमारती अजुनही गावांमध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ६० गावांमध्ये आजही या इमारती उभ्या आहेत. पिकांची नासधूस करणाऱ्या पशूंना कोंडवाड्यात कोंडल्यावर मालकांना दंड ठोठावण्यात येत असे़ याचा ग्रामपंचायतीला सुद्धा आर्थिक फायदा होत होता. वार्षिक उत्पन्नात यामुळे भर पडत होती. सध्या पशुपालन व्यवसायासोबतच गावोगावच्या कोंडवाड्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. काही गावात केवळ फलकच राहिले आहेत. तर काही कोंडवाडे शिल्लक असून तेथे कोणतेही जनावर वर्षभरात कोंडलेही जात नाही. नासधूस करणाऱ्या प्राण्यांना कोंडवाड्यात कोंडल्यावर येणाऱ्या खर्चाचा काही भाग पशुचारा म्हणून ग्रामपंचायतीला मिळत असे. सध्या या कोंडवाड्याची अवस्था दयनीय झाली आहे. (प्रतिनिधी)
पशुधन घटल्याने जनावरांविना उरले कोंडवाडे
By admin | Updated: March 26, 2015 01:33 IST