भीमराव मेश्राम जोगीसाखरावडसा वन परिक्षेत्रांतर्गत शिरपूर उपक्षेत्रातील अरततोंडी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नवीन रोपवनासाठी खड्डे खोदकाम करण्यात आले. मात्र या कामातून स्थानिक मजुरांना डावलून पिंपळगाव येथील मजुरांकरवी खड्डे खोदकाम करण्यात आले. गावातील मजुरांचा रोजगार हिरावणाऱ्या वनरक्षक एम. के. येडेवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्यायग्रस्त मजुरांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अरततोंडी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत अरततोंडी बिटामध्ये नव्या रोपवनाचे काम घेण्यात आले. दरम्यान झुडूपांच्या फांद्या कटाईचे काम सरासरी ३० मजुरांनी पाच दिवसांत केले. या मजुरांना २८६.७३ रूपये ऐवजी २८० रूपयांप्रमाणे मजुरी देण्यात आली. ४५ बाय ४५ सेंटीमिटरच्या आकाराच्या एका खड्ड्याचा भाव ११ रूपये ४६ पैसे आहे. मात्र संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गावातील मजुरांकडून दोन दिवस खड्डे खोदण्याचे काम करून त्यांना प्रति खड्डा नऊ रूपयांप्रमाणे मजुरी वितरित केली. मजुरी परवड नसल्याच्या कारणावरून गावातील मजुरांनी खड्डे खोदण्याचे काम बंद केले. तसेच खड्डे खोदाईच्या कामाच्या दराचा शासकीय कागदपत्रे दाखवा, अशी मागणी वनरक्षक एम. के. येडेवार यांच्याकडे मजुरांनी केली. यावेळी येडेवार यांनी आम्ही देत असलेल्या दरानुसार काम करा अन्यथा दुसऱ्या गावातील मजूर लावून काम करण्यात येईल, अशी तंबी गावातील मजुरांना दिली. त्यानंतर वनरक्षक येडेवार यांनी लगतच्या पिंपळगाव येथील मजूर लावून रोपवनात खड्डे खोदण्याचे काम केले. स्थानिक पातळीवर रोजगार देण्याबाबत शासन निर्देश आहेत. मात्र वनरक्षक येडेवार यांनी मनमर्जीने या शासन निर्णयाचे उल्लंघन केले. असा आरोपही मजुरांनी वनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकाराची योग्य चौकशी करून संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वनरक्षक येडेवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मन्साराम कुमोटी, ईश्वर नरोटे, मोतिराम परचाके, दिलीप परचाके, अरूण मडावी, गुरूदेव पाठणकर, कैलाश परचाके, ममता तुलावी, मीना मडावी आदी मजुरांनी केली आहे.
कामात स्थानिक मजुरांना डच्चू
By admin | Updated: May 15, 2015 01:32 IST