रांगी येथील घटना : फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात झाला घातरांगी : शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील रांगी येथे घडली. रवींद्र रामाजी बोरसरे (४०) रा. रांगी असे मृतक ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.रांगी येथील शांताराम बरडे यांनी दोन महिन्यांपूर्वी नवीन ट्रॅक्टरची खरेदी केली. खरीप हंगामातील शेतातील नांगरणी व चिखलणीकरिता रवींद्र बोरसरे यांला ट्रॅक्टरचालक म्हणून कामावर घेतले. शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरचालक रवींद्र याने रांगी येथील नामदेव बैस यांच्या शेतात चिखलणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला. चिखलणी करताना ट्रॅक्टर फसला. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी रवींद्र बोरसरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो घरी परतला. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा शेतात जाऊन फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान काही वेळानंतर फसलेला ट्रॅक्टर बाहेर निघाला. मात्र केसबिलला लावलेल्या बल्ल्या अडकून राहिल्याने सदर ट्रॅक्टर पुन्हा कोरड्या जमिनीवर उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली आल्याने दबून ट्रॅक्टरचालक रवींद्र बोरसरे याचा मृत्यू झाला. मृतक रवींद्र बोरसरे याच्या मागे पत्नी, दोन लहान मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. मृतक रवींद्र हा रांगी येथील कार्तिक बुंडरे यांचा जावई असून तो गेल्या सात वर्षांपासून सासुरवाडी असलेल्या रांगी येथे स्थायी झाला होता. (वार्ताहर)
ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार
By admin | Updated: July 26, 2015 02:38 IST