धानोरा : अल्प मानधनावर नियमितपणे आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील आयुष डॉक्टरांचे मागील सात महिन्यांपासून मानधन थकले आहे. यामुळे या डॉक्टरांवर उपासमारीची पाळी आली आहे. मार्च ते सप्टेंबर २०१४ या कालावधीतील सात महिन्यांचे मानधन आयुष डॉक्टरांना मिळाले नाही. त्यामुळे या डॉक्टरांपुढे कुटुंंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आयुष डॉक्टरांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता व एनआरएचएमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आयुष डॉक्टरांचे मानधन थकले असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी आयुष डॉक्टरांना सांगितले. धानोराच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिद हे प्रशिक्षणासाठी कर्नाटक राज्यात गेले आहेत. त्यामुळे या रूग्णालयातील ओपीडी सध्या आयुष डॉक्टरांच्या भरवशावर आहे. आधीच अत्यल्प मानधनात गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम जिल्ह्यात आयुष डॉक्टर सेवा देत आहेत. मात्र त्यांचे मानधन थकल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील कार्यरत आयुष डॉक्टरांचे मानधन देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
डॉक्टरांना सात महिन्यांपासून मानधन नाही
By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST