शांती मेळावा : संदीप गावित यांचे आवाहन भामरागड : अतिदुर्गम भागाच्या विकासासाठी शासन स्तरावरून विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी विकास साधावा, नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केले. नक्षली सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भामरागड येथे शांती मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून गावित बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना हिरेखन, आनंद गेथे, शिक्षण विस्तार अधिकारी जगदीश बद्रे, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महागडे, पीएसआय दत्ता शेरके, प्रमोद बनकर, आर. एस. कुलसंगे, के. एन. पिपरे, एस. जी. वाघुले, एस. एम. वाघमारे, बाकळा, सुनीता मट्टामी उपस्थित होते. चांगल्या प्रशासनाने नागरिकांचा विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. याकरिता संरक्षण देणे हे पोलिसांचे कार्य आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही गावित यांनी केले. सदर मेळावा शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी ४०० लोकांच्या जेवणाचीही व्यवस्था पोलिसांच्या वतीने करण्यात आली.
नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका
By admin | Updated: July 29, 2016 01:11 IST