कुलगुरूंचा आशावाद : गोंडवाना विद्यापीठात व्यसनमुक्तीवर कार्यशाळा गडचिरोली : पूर्वी व्यसनाधिनतेचे प्रमाण अतिशय अल्प होते. मात्र अलिकडे समाजामध्ये दारू, तंबाखू, ड्रक्स सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरूण पिढी व्यसनाधिनतेचे आहारी गेली आहे. समाजाला व्यसनाधिनतेपासून मुक्त करायचे असेल तर सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते. गडचिरोली जिल्हा एक दिवस नक्कीच व्यसनमुक्त होईल, असा आशावाद गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच मुक्तिपथ व सर्च फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी महाविद्यालय दारू, तंबाखू व ड्रक्सपासून मुक्ततेकडे वाटचाल या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुक्तिपथ संस्थेचे संस्थापक डॉ. मयूर गुप्ता, सर्च फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार खोरगडे, डॉ. प्रिया गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले, महाविद्यालय परिसरात तंबाखू, खर्रा व इतर व्यसनाच्या मुक्तीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणून परिवर्तन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे डॉ. कल्याणकर म्हणाले. याप्रसंगी डॉ. मयूर गुप्ता यांनी ‘सत्यमेव जयते ही चित्रफित दाखवून महाविद्यालय व्यसनमुक्त करण्याचा कृती आराखडा प्रभावीपणे कसे राबविता येईल, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, संचालन विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी केले तर आभार डॉ. प्रिया गेडाम यांनी मानले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
- तर जिल्हा व्यसनमुक्त होईल
By admin | Updated: January 25, 2017 02:08 IST